मुंबई – निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात आज रविवारी सकाळी चेंबूरमध्ये ठाकरे गटाने जोरदार निदर्शने केली.शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोग हा भाजपच्या हातातील कठपुतळी असल्याची टीका अनेक नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये केली.
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चेंबूर स्थानकापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मोर्चाची सांगता झाली.मोर्चामध्ये निवडणूक आयोगा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, माजी विभागप्रमुख मंगेश सातमकर,आमदार प्रकाश फातर्फेकर,माजी आमदार तुकाराम काते आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्यासह ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी ,समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले.निवडणूक आयोग हा भाजपच्या हातातील कठपुतळी असून भाजप सांगेल तसा तो वागत आहे. तसेच शिवसेनेचे नाव आणि चिन्ह जरी कुणी चोरले असले तरी अगदी देशाबाहेर पाकिस्तानात जावून कुणालाही विचारले तरी सगळेच म्हणतील की शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे,”. या आंदोलनासाठी येणार्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असल्याचे दिसताच सकाळपासून लावलेल्या बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली होती. मात्र मोर्चावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.