परभणी- निलगाय धडकल्याने झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला.तर एकजण गंभीर जखमी झाला.जिंतूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आज मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास जिंतूर- येलदरी राज्यमार्गावर हा अपघात झाला.
या अपघातातील मृताचे नाव शाम राजू राठोड (१८) असे तर जखमीचे नाव ओमकार सुदाम जाधव (२१) असे आहे.हे दोघेही तालुक्यातील येनोली तांडा येथील रहिवासी आहेत.शेवडी, येनोली परिसरात रोही, हरीण,रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा चारा पाण्याच्या शोधात नेहमीच वावर असतो. आज मंगळवारी सकाळी शाम व अशोक हे दोघे तरुण स्कुटीवरून जिंतूर शहराकडे येत असताना ज्ञानोपासक महाविद्यालया जवळच्या रस्त्यावर रोहींचा कळप रस्ता ओलांडत होता. त्यातील एक रोही त्यांच्या स्कुटीवर धडकून अपघात झाला. अपघातात शाम राठोड याचा जागीच मृत्यू झाला.तर ओमकार जाधव हा डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला.अपघाताच्या आवाजाने जमा झालेल्या जवळपासच्या नागरिकांनी त्यांना तातडीने रिक्षात ठेवून जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला पुढील उपचारासाठी परभणीला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.