नवी दिल्ली- मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधान प्रकरणी रझा अकादमीने नुपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. या प्रकरणी नुपूर शर्मा पोलिसांसमोर हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई पोलिस दिल्लीत त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिस सहकार्य करत नाहीत, असा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी टीव्हीवरील चर्चेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद भारतासह परदेशातही उमटले. या प्रकरणी रझा अकादमीने मुंबई पोलिस पोलिसांकडे शर्माविरोधात तक्रार केली आहे. पायधुनी पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी शर्मा यांना नोटीस बजावली. मात्र त्या चौकशीसाठी हजर राहिलेल्या नाहीत. सध्या त्या नॉट ट्रेसेबल आहेत. मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.