मुंबई – नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. सोबतच तत्कालीन ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या परिसरात झडती सुरू आहे. चित्रा यांच्यावर एका आध्यात्मिक गुरूसोबत गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. यापूर्वी, ११ फेब्रुवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने चित्रा रामकृष्ण यांना दंड ठोठावला होता. एक्सचेंजची अंतर्गत गोपनीय माहिती अज्ञात व्यक्तीसोबत शेअर केल्याबद्दल बाजार नियामकाने चित्रा यांना ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याशिवाय चित्रा यांच्यावर आनंद सुब्रमण्यन या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीतही अनियमितता केल्याचा आरोप आहे. यासाठी एनएसई आणि वरिष्ठ व्यवस्थापनही जबाबदार होते. चित्रा रामकृष्ण या मागील २० वर्षांपासून हिमालयातील कथित योगीच्या सल्यानुसार आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेत होत्या. तसेच शेअर बाजाराशी संबंधित महत्वाची माहितीही योगीला पाठवत होत्या.
विशेष बाब म्हणजे आतापर्यंत त्या एकादाही या योगीला भेटलेल्या नाहीत. हे योगी कुठेही प्रकट होऊ शकतात असा त्यांचा दावा आहे. या आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शेअर बाजाराचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार आनंद सुब्रमण्यन यांच्या हायप्रोफाईल नियुक्तीमध्येही या निनावी योगीचा सहभाग असल्याचे सेबीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आनंद सुब्रमण्यन यांची समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सुब्रमण्यन यांना गुंतवणूक विश्वातील कोणीही ओळखत नाही. त्यांनी 2016 मध्ये पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनेक खुलासे समोर आले आहेत.