मुंबई – नेस्कोचे संस्थापक कृष्णा पटेल यांनी मुंबईच्या मलबार हिल परिसरात ९३ कोटींना बंगला खरेदी केला आहे. विशेष म्हणजे तिथे काही काळ महात्मा गांधीजींनी मुक्काम केला होता. ‘लेंबर्म हाऊस’ असे या बंगल्याचे नाव आहे. ब्रिटीशांच्या काळात झाडांच्या नावांवरून त्याचे नामकरण झाले आहे.
मुंबईतील मलबार हिल रोडवरील लेंबर्म रोडवर हा बंगला आहे. तो अनेक दशकांपासून पुरुषोत्तमभाई अमर्सी यांच्या कुटुंबाकडे होता. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी मुंबईत आल्यानंतर महात्मा गांधीजी या बंगल्यात थांबत होते. ब्रिटिश काळात येथे लावलेल्या गोल्डन शॉवर ट्रीच्या नावावरून बंगल्याचे नामकरण झाले आहे. मलबार हिल ही मुंबईतील लक्ष्मीपुत्रांची वसाहत म्हणून ओळखली जाते. तेथील ९ हजार ३७५ चौरस फुटांवर असलेला हा तीन मजली बंगला ९३ कोटींना विकला आहे. नेस्कोचे कृष्णा पटेल यांनी तो विकत घेतला. ८ डिसेंबर २०२१ रोजी हा व्यवहार झाला. १ लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने हा व्यवहार झाला असल्याचे सांगितले जाते.