कल्याण – टी-८० ही भारतीय नौदलाची युद्धनौका कल्याण डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.आता भारतीय नौदलाचा,मराठा नौदलाचा गौरवशाली आणि प्रेरणादायी इतिहास टी-८० या युद्धनौकेच्या स्वरूपात भावी पिढ्यांसाठी दुर्गाडी खाडीकिनारी जतन केला जाईल असे मत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केले.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे भारतीय नौदलाची युद्ध नौका टी-८० स्मारकाच्या स्वरुपात विराजमान करण्यासंदर्भात भारतीय नौदल आणि एसकेडीसीएल यांच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात सामंजस्य करार झाला होता. या पार्श्वभूमीवर काल मुंबईतील कुलाबा येथील नौसेना डॉक यार्ड मधून टी-८० ही युद्धनौका महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, माजी महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नौदलाचे रिअल ऍडमिरल ए एन प्रमोद,कमोडर जिलेट कोशी यांनी एसकेडीसीएलच्या माध्यमातून महापालिकेकडे सुपूर्द केली. या ऐतिहासिक क्षणी एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा उपस्थित होते. कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासूनचे माझे स्वप्न- उद्दिष्ट आज साकार झाले असून कल्याणच्या इतिहासात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी हातभार लागल्याबाबत मला सार्थ अभिमान वाटतो अशा भावना माजी महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान, या युद्ध नौकेचे कुलाबा येथून जलमार्गाने कल्याण दुर्गाडी येथे दोन दिवसात आगमन होणार असून किल्ले दुर्गाडी येथे, नदीकिनारी विकास प्रकल्पातील आरमार स्मारकाचा भाग म्हणून या युद्धनौकेचे जतन केले जाणार आहे.कल्याण येथे दाखल होत असलेल्या टी -८० या युद्धनौकेमुळे कल्याणमधील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच पुढील पिढ्यांसाठी प्रथमच या युद्धनौकेच्या स्वरूपात एक प्रेरणादायी स्मारक किल्ले दुर्गाडी येथे उभारले जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.