अहमदाबाद – गुजरात उच्च न्यायालयातील न्यायाधीश निखिल एस. करियल यांची पाटणा उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या प्रस्तावित बदलीच्या निषेधार्थ काल गुजरात उच्च न्यायालय संघटनेच्या सर्व वकिलांनी अचानक सामूहिकपणे काम बंद आंदोलन केले.
यावेळी न्यायाधीश करियल यांची पाटणा उच्च न्यायालयात बदली होणार असल्याचे समजताच गुजरात बार असोसिएशनने तातडीची बैठक बोलावली आणि बदलीचा निषेध करण्यासाठी असोसिएशनचे शेकडो सदस्य वकील, वरिष्ठ वकील मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयात जमले.पण एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने न्यायालयात जमण्याचे कारण मुख्य न्यायाधीशांनी विचारले. यावेळी वरिष्ठ वकील मिहीर ठाकोर यांनी सांगितले की, ‘‘न्या.करियल यांच्या पाटणा उच्च न्यायालयातील प्रस्तावित बदलीविरोधात आम्ही सर्वजण आहोत.’’ यावर मुख्य न्यायाधीश कुमार यांनी विचारले असता ‘बार अँड बेंच’च्या संकेतस्थळावरून याबाबत समजल्याचे वकिलांनी सांगितले.तसेच सामान्यपणे न्यायाधीशांची बदली करण्यापूर्वी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सल्लामसलत करतात,असे वरीष्ठ वकिलांनी मुख्य न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिले.