नवी दिल्ली- राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड 9 नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार असून ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत सांगितले आहे की, भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना 9 नोव्हेंबर रोजी होणार्या औपचारिक शपथविधीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. 1998 मध्ये त्यांना मुंबई हायकोर्टात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्या. डीवाय चंद्रचूड हे शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश राहिले आहेत.