नवी दिल्ली- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या राज्यातील शिक्षकांबाबत महत्वाची भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाने आमच्याकडे जनगणनेसाठी 68 हजार शिक्षकांची मागणी केली होती. मात्र तुम्हाला शिक्षक दिले तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, असा सवाल करत पंजाबचे शिक्षक शिकवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नसल्याची घोषणा मान यांनी केली.
सिंगापूरमधील शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पंजाबचे 36 मुख्याध्यापक सहभागी झाले होते. ते शनिवारी देशात परतले. त्या शिक्षकांनी दिल्लीत आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोस बैंस उपस्थित होते. त्यावेळी भगवंत मान म्हणाले की, शिक्षकांचे प्रश्न सोडण्यासाठी माझे सरकार नेहमीच प्रयत्न करणार आहे. जनगणनेच्या कामांची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी आमच्याकडे निवडणूक आयोगाने 68 हजार शिक्षक द्या, अशी मागणी केली आहे. तुम्हाला शिक्षक दिले तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? शिक्षक कमी झाले तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे पंजाबचे शिक्षक शिकवण्याचे काम करतील, त्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नाहीत.