तरनतारन- पंजाबमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी तरन तारणच्या सरहाली पोलीस ठाण्यावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र पोलिसांनी याबाबत स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला आहे.
प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसने पोलीस ठाण्यावर झालेल्या रॉकेट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास फायर केलेले रॉकेट पोलिस स्टेशनच्या लोखंडी गेटवर आदळले त्यामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.ऑगस्टमध्ये पंजाबमध्येही असाच दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मोहालीस्थित मुख्यालयावर दहशतवाद्यांनी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने (आरपीजी) हल्ला केला. कॅनडामध्ये बसलेल्या लखबीर सिंग या दहशतवाद्याशी याचे धागे जोडले गेले होते.जुलै महिन्यात याच परिसरात २.५ किलो आरडीएक्स आणि आयईडीसह एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.