चंदिगड – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर पंजाब पोलिसांनी संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यात लॉरेन्स बिश्नोई आणि हरविंदर सिंग रिंदा यांच्या टोळीतील ११ गुंडांना अटक केली आहे. त्यामुळे ७ हत्या, पोलिसांच्या तावडीतून २ गुंडांची सुटका आणि ४ दरोड्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाइंड बिश्नोई आहे. या हत्येत रिंदाही सहभागी असल्याचे मोहाली पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले. त्यानंतर पंजाब पोलिसांनी बिश्नोई-रिंदा टोळीविरोधात धडक कारवाई सुरू केली. त्यात ११ गुंडांना अटक केली असून त्यामध्ये ५ शर्पशूटर आहेत. त्यांच्याकडून चोरलेली ५ वाहने आणि ९ हत्यारे जप्त केली आहेत. हे ११ गुंड अनेक हत्या, हत्येचे प्रयत्न, दरोडे, खंडणी आदी गुन्ह्यांत गुन्हेगार आहेत. त्यांच्या अटकेमुळे ७ हत्या कट उधळले गेले. याशिवाय पोलीस कस्टडीतून २ गुंडांना पळवून नेण्याचा ते प्रयत्न करणार होते तो विफल झाला. याशिवाय दरोड्याच्या ४ योजना निष्फळ ठरल्या.