पंढरपूर – आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आल्याने पंढरपुरात सध्या प्रसादाचा लाडू बनवण्याची लगबग सुरू आहे. दररोज सुमारे ३० ते ४० हजार बुंदीचे लाडू तयार करण्यात येत आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांसाठी यंदा प्रसादाचे १० लाख लाडू बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बुंदीचा लाडू तयार करण्याची जबाबदारी नाशिक येथील यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संघाकडे दिली आहे. त्यांच्याकडून पंढरपूर परिसरातील कासेगाव रस्त्यालगतच्या कारखान्यात लाडू बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दररोज दिवस व रात्रपाळीमध्ये मिळून सुमारे ४० कर्मचारी लाडू बनवण्याचे काम करत आहेत. यात ५ आचारी बुंदी तयार करणे, २० महिला कर्मचारी लाडू बनवणे आणि २० महिला कर्मचारी लाडू पॅकिंग करण्याचे काम करत आहेत. लाडू पॅकिंग झाल्यानंतर वाहनाद्वारे ते विठ्ठल मंदिर समितीच्या लाडू केंद्रावर विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत. समितीच्यावतीने मंदिर परिसरात सुमारे तीन ते चार ठिकाणी लाडू विक्रीची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. बुंदीचे दोन लाडू २० रुपयांना, तर राजगिराचे दोन लाडू १० रुपयांना अशी विक्री करण्यात येत आहेत.
दरम्यान, यापूर्वी लाडू पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केला जात असे, मात्र आता पर्यावरणपूरक अशा बटर पेपरच्या पिशवीमध्ये लाडू पॅकिंग करण्यात येत आहेत.