पंढरपूर – विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत स्नान करण्याची प्रथा आहे. मात्र सध्या या चंद्रभागेच्या स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. तसेच पाण्यात अळ्या आणि किडेही मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. त्यामुळं तातडीने चंद्रभागेतील पाणी प्रवाहीत करून नदीचं प्रदूषण दूर करावे अशी मागणी वारकरी आणि स्थानीक नागरीकांनी केली आहे.
विठुरायाच्या दर्शनाला येणारे हजारो भाविक आधी चंद्रभागेचे पवित्र स्नान करतात आणि मगच विठुरायाच्या दर्शनाला जातात. मात्र सध्या या चंद्रभागेच्या स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होण्यास सुरुवात झाली असल्याची तक्रार भाविक करू लागले आहेत. सध्या चंद्रभागेवर ठिकठिकाणी बंधारे बांधल्यामुळे नदीचे वाहते पाणी हा भागच उरलेला नाही. दोन बंधाऱ्याच्यामध्ये असलेले हे पाण्याचे डबके बनल्याने भाविक स्नान करीत असलेले पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात अळ्या आणि किडे झाले आहेत. या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात शेवाळे आणि जलपर्णी असल्याने भाविक स्नान करून बाहेर येताच त्यांच्या अंगाला खाज सुटणे, पुरळ उठणे अशा पद्धतीचे त्रास होत असल्याची भाविकांची तक्रार आहे.
सध्या स्नानाच्या ठिकाणी असलेले पाणी हे पावसाळ्यात अडवलेले असून जवळपास तीन महिन्यापासून याच पाण्यात भाविक पवित्र स्नान करत आहेत. मात्र प्रशासन या प्रदूषित पाण्याबाबत विचार करीत नसल्याने याचा फटका रोज हजारो भाविकांना बसत आहे. आता किमान काही ठराविक दिवसानंतर चंद्रभागेतील पाणी बदलण्यासाठी तरी प्रशासनाने प्रयत्न केल्यास भाविकांना होणारे आरोग्याचे त्रास कमी होतील अशी मागणी भाविक करीत असून, प्रशासनाचा गलथानपणा पाहायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हेलिकॉप्टरमधून चंद्रभागेचे फोटो काढले तर भाविकांना भोगाव्या लागणाऱ्या मरण यातना त्यांना समजतील अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केली आहे.