पंढरपूर – कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी निघालेल्या वारकर्यांच्या दिंडीत भरधाव कार घुसल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली. या भीषण घटनेत सात वारकर्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य सरकारकडून मृत वारकर्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील 15 वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघाले होते. मात्र वाटेत सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ चालत असताना आज सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. यावेळी झालेल्या अपघातात वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील 7 वारकर्यांचा जागीच मृत्यू झाला असून, 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.