नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत भारताची अवस्था वाईट झाली आहे. भारताला सलग दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या या खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केएल राहुल संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले. मात्र आता बीसीसीआयच्या या निर्णयावर थेट ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू ब्रॅड हॉग याने नाराजी व्यक्त केली आहे. पंतच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याला भारताचा कर्णधार बनवायचे होते, असे ब्रॅड हॉगचे मत आहे.
ब्रॅड हॉग म्हणाला, ‘केएल राहुलनंतर हार्दिक पांड्या टी-ट्वेन्टी मालिकेत कर्णधार व्हायला हवा होता. आयपीएलमध्ये हार्दिकने आपली क्षमता सिद्ध केली आहे. कठीण परिस्थितीत तो चांगली कामगिरी करतो. हार्दिक पांड्या फलंदाजी असो वा गोलंदाजी असो, चांगली कामगिरी करत आहे. भारताने सुरुवातीलाच विकेट गमावल्या तर हार्दिक पांड्या पुढे डाव सांभाळू शकतो’, असे हॉगने म्हटले. दरम्यान, हार्दिक पांड्याने नुकतेच गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२ची ट्रॉफी जिंकून दिली आहे.