पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. वनाज-गरवारे कॉलेज या पहिल्या टप्प्यातील पुणे मेट्रोच्या सेवेचे ते उद्घाटन करणार आहेत. याशिवाय महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांचा यापूर्वीच पुणे दौरा आयोजित केला होता. परंतु काही कारणांमुळे तो रद्द झाला होता.
पुणे महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. असे असताना पंतप्रधान मोदी ६ मार्चला पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यात ते वनाज-गरवारे कॉलेज या पुणे मेट्रोच्या पहिल्या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय महापालिकेत बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. २०१७ च्या निवडणुकीत पुण्यात भाजपचे ९९ नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा पुण्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने आत्तापासून कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधानांचा हा पुणे दौरा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.