लखनौ – ईडीचे माजी सहसंचालक राजेश्वर सिंह हे लखनौमधून भाजपकडून उमेदवारी घेवून विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. राजेश्वर सिंह यांनी जवळपास १३ वर्ष ईडीमध्ये काम केले. तथापि, पंतप्रधान मोदी हे एक प्रभावशाली, स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. त्यांनी भारताला संपूर्ण जगावर एक महासत्ता देश म्हणून स्थापित केले आहे. त्यांच्यामुळे भारताला नवी ओळख मिळाली. पंतप्रधान मोदींचे काम आवडले, म्हणूनच भाजपामध्ये प्रवेश केला, असा खुलासा ईडीचे माजी सहसंचालक राजेश्वर सिंह यांनी केला.
यावेळी बोलताना राजेश्वर सिंह म्हणाले की, सिंह म्हणाले, ‘ईडी भाजपच्या इशाऱ्यावर काम करते’ अशा पद्धतीची वक्तव्य करणे हे विरोधकांचे काम आहे. पण काँग्रेसचे सरकार होते तेव्हा देखील ईडी होते, तेव्हा कोणाला काही अडचण नव्हती. आज भाजपचे सरकार आहे तेव्हा देखील ईडी आहे. मग आज का कोणाला अडचण आहे? ईडी ही एक स्वतंत्र चालणारी यंत्रणा आहे. समन्स देणे, छापा टाकणे, अटक करणे या सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहुन होतात. सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीचे ईडीच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष असते. न्यायालय असते, त्यामुळे ईडीवर आरोप करणे हे चुकीचे असल्याचे यावेळी ते म्हणाले.