नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी सोमवारपासून कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर बंगळुरूमधील सर्व महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. काहींना शिक्षण विभागाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत, तर काहींनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि रहदारीच्या परिस्थितीमुळे स्वतःहून बंद केले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडून सध्या संपूर्ण कर्नाटकात अग्निपथ आणि ईडीविरोधात निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे सध्या बंगळुरूमध्ये वातावरण तापले असल्यामुळे येथील नागरिकांकडूनही पंतप्रधानांच्या आगमनाला विरोध होत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळुरू दौऱ्यामुळे सोमवारी अनेक शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी सर्व विद्यार्थी आणि बंगळुरू विद्यापीठाच्या ज्ञान भारती कॅम्पसमधील अध्यापन आणि शिक्षकेतर प्राध्यापकांसाठी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने २२ शाळांमध्ये एक दिवसाची सुट्टीही जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधानांच्या मार्गात येणाऱ्या सर्व शाळा, सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीच्या बदल्यात येत्या काही दिवसांत कोणत्याही एका सुट्टीच्या दिवशी शाळा सुरू करता येतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, सरकारने निवडक संस्थांना सुट्टी जाहीर केली असताना म्हैसूर रोडलगतच्या काही खाजगी शाळांनी शहराच्या त्या भागात वाहतूककोंडी होण्याच्या कारणामुळे स्वतःहून सुट्टी जाहीर केली असल्याचे समजते. यावर आता अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून टीकाही होत असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्य दौऱ्यापूर्वी बंगळुरूमधील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्याने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतूक समस्यांमुळे शाळा बंद करणे योग्य आहे का, असा सवाल केला. तर एका नेटकऱ्याने ट्विटर पोस्टमध्ये सांगितले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे बंगळुरूमधील शाळा वाहतुकीचे कारण सांगत बंद ठेवल्या. तसेच त्यांची सुरक्षितता महत्त्वाचे असल्याचे कारणही देण्यात आले आहे पण त्यामुळे शाळा बंद करण्याचे काय कारण? हे किती योग्य आहे? सुशिक्षित वर्गाकडून हे कसे सहन केले जाते? कर्नाटकात शिक्षणाचा कसा खेळखंडोबा सुरू आहे ही वस्तुस्थिती मिडीकडून का दाखवली जात नाही? नेत्यांच्या दौऱ्यामुळे दोन वर्षांनी सुरु झालेल्या शाळा बंद ठवणे कितपत योग्य वाटते? असे प्रश्न उपस्थित करत अनेकांनी नेमकी कसली भीती आहे त्यांना? शाळा-महाविद्यालयांमध्ये दहशतवादी आहेत असे वाटते का? पण कर्नाटक हे तर शांतता प्रिय स्टेट आहे अशीही टिप्पणी केली आहे.