कोलंबो – गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला सात दिवसांत नवा राष्ट्रपती मिळणार आहे अशी घोषणा संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी आज केली. गोटाबाया राजपक्षे यांनी गुरुवारी राष्ट्रपतीपदाचा कायदेशीर राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 22 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी हंगामी राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना श्रीलंकेचे सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांनी त्यांना शपथ दिली. 22 जुलैपर्यंत ते अध्यक्ष असतील. आता शनिवारी संसदेची बैठक होणार असल्याचे संसदेचे अध्यक्ष अभयवर्धने यांनी सांगितले. खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी त्यांनी जनतेला शांततापूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन केले आहे.
अखेर गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. गोटाबाया यांनी आपला राजीनामा सिंगापूरमधून ई-मेलद्वारे श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला आहे. 73 वर्षीय गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते काल सिंगापूरला पोहोचले.