मुंबई – पत्रकार राणा अयुबला बलात्कार आणि ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने भोपाळमध्ये अटक केली आहे. त्याने सोशल मीडियावरून ही धमकी दिली होती. सिद्धार्थ श्रीवास्तव असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे तो दहावीपर्यंतच शिकला आहे.
पत्रकार राणा अयुबने आपले काम थांबवले नाही तर बलात्कार करून हत्या करण्याची धमकी सिद्धार्थने मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटर आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून दिली होती. या प्रकरणी राणा अयुबने मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. धमकीबरोबरच त्याने अपशब्द वापरले होते. २८ जानेवारीला मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. त्यात त्यांनी भोपाळमधून सिद्धार्थला अटक केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर राणा अयुबने मुंबई पोलीस आणि आयुक्तांचे आभार मानले. मला दिलेले वचन तुम्ही पूर्ण केले. त्यामुळे या प्रकरणात मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.