कोल्हापूर : महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली आहे.
या पत्राद्वारे संभाजीराजेंकडून किल्ल्याची तटबंदीसह काही बुरुज ढासळले असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या काही वर्षांपासून महापुराचा सामना करावा लागत आहे, या संततधार पावसामुळे पन्हाळा किल्ल्याचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले असून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थही दिवस-रात्र भीतीच्या छायेत जगत आहेत. बुरुज आणि तटबंदी कोसळल्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावात मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट येत आहेत. दुर्दैवाने काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याची नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच अशा परिस्थितीत पन्हाळ्याला केंद्रीय पुरात्तव खात्याचा पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी नसल्याने राज्य शासनाची ही जबाबदारी ठरते की वेळीच किल्ल्याची डागडुजी व संवर्धन केलं नाही, तर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला ऐतिहासिक ठेवा नष्ट होईल, अशी भीती देखील त्यांनी यातून व्यक्त केली आहे. पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन व नगरपालिकेबाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.