नागपूर – कोरोनाची आटोक्यात आलेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने जंगल सफारीच्या नियमात शिथिलता आणली आहे. त्यानुसार आजपासून पर्यटकांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह इतर जंगल सफारी सुरू झाल्या आहेत. मात्र त्यासाठी काही नियम आणि निर्बंध पाळावे लागणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून पर्यटकांना जंगल सफारीची परवानगी सरकारने दिली आहे. उद्या ३ फेब्रुवारी पासून ताडोबातील कोअर आणि बफर अशा दोन्ही ठिकाणचे पर्यटन सुरू होणार आहे.
राज्य सरकारच्या महसूल आणि वन आपत्ती व्यवस्थापन विभागाने जंगल सफारी सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी नवीन नियम आणि निर्बंध केले आहेत. त्याची माहिती संबंधित जंगल सफारी आणि व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनाला दिली आहे. या जंगल सफारीसाठी ऑनलाईन बुकिंग बंधनकारक आहे. याशिवाय मास्क, कोरोना लसीचे दोन डोस, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ११ जानेवारीपासून बंद असलेली जंगल सफारी पुन्हा पर्यटकांसाठी खुली झाली आहे.