पिंपरी – पिंपरी-चिंचवडसह मावळची तहाण भागणार्या पवना धरणाने तळ गाठला. या धरणात 19 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. तो 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा असून येत्या काही काळात पावसाने हजेरी लावली नाही तर पिंपरी-चिंचवडकरांवर जल संकटाची टांगती तलवार येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
पाऊस न झाल्यास पाणी कपातीबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे देखील ते म्हणाले आहेत. याआधीच शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. त्यात पाऊस न झाल्यास आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पवना धरणाने तळ गाठला असून धरणात केवळ 19 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणात 34 टक्के पाणी साठा उपलब्ध होता. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे 34 टक्क्यांवर पाणी साठा गेला होता, अशी माहिती पवना पाटबंधारे उपअभियंता अशोक शेटे यांनी माहिती दिली आहे.