संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

पाकिस्तानातील रुग्णालयाच्या छतावर आढळले ५०० मृतदेह, अवयव गायब

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कराची- पाकिस्तानातील मुलतान शहरातील पंजाब निश्तार रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या हॉस्पिटलच्या छतावर मृतदेहांचा ढीग पडलेला आढळला आहे. रुग्णालयाच्या छतावर सापडलेल्या सर्व मृतदेहांचे तुकडे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मृतदेहांमधून शरीराचे अवयवही गायब आहेत. काही मृतदेहांच्या छाती उघड्या आहेत.मृतदेहातून हृदय व इतर अवयव काढण्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.अंदाजे ५०० मृतदेह याठिकाणी आढळून आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये, पंजाब निश्तार हॉस्पिटलच्या छतावर सापडलेल्या या मृतदेहांची संख्या सुमारे ५०० म्हटली जात आहे. हे मृतदेह कोणाचे आहेत आणि ते रुग्णालयाच्या छतावर का ठेवण्यात आले याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. मात्र,या मृतदेहांचा वापर मानवी अवयवांच्या तस्करीसाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी केला जात असावा, असे बोलले जात आहे. हॉस्पिटलच्या टेरेसवर सापडलेल्या या मृतदेहांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.मात्र,हे व्हिडिओ तुमचे लक्ष विचलित करू शकतात कारण व्हिज्युअल्स खूपच भयावह आहेत.
या प्रकरणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार चौधरी जमान गुर्जर यांनी पंजाब निश्तर हॉस्पिटलला भेट दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतानाच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनीही या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतदेह अशा प्रकारे ठेवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दक्षिण पंजाबचे अतिरिक्त मुख्य सचिव साकिब जफर यांनी विशेष आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांची टीम तयार केली असून तीन दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान,विद्यापीठातील विद्यार्थी वैद्यकीय प्रयोगांसाठी या मृतदेहांचा वापर करत असल्याचे निश्‍तर वैद्यकीय विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने म्हटले आहे. या सर्व मृतदेहांवर यापूर्वीही वैद्यकीय प्रयोग करण्यात आले आहेत.या मृतदेहांमधून हाडे आणि कवट्या काढून पुढील वापरासाठी छतावर ठेवण्यात आल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या