रायगड – अतिवृष्टी, दरड कोसळण्याची भीती आणि महामार्गाचं काम हे सगळं लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तीन घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात कोकणातील वरंध घाट, रघुवीर घाट आणि कामथे घाट (एक मार्गिका बंद) बंद ठेवण्यात आले आहेत.
महाड-पुणे मार्गावरील वरंध घाट धोकादायक असून काल दरड कोसळल्यानंतर वरंध घाट आजपासून तीन महिने अवजड वाहतुकीसाठी बंद ठेण्यात आला आहे .1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत घाट रस्ता बंद राहणार आहे. अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. वरंध घाटात सातत्यानं दरड रस्त्यावर खाली येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हाधिकार्यांनी घाट बंद ठेवण्याची अधिसूचना काढली आहे. सध्या राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बर्याच घाटांत दरडी कोसळण्याचं प्रमाणही वाढलंय. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.
कामथे घाटातील
रस्त्याला मोठी भेग
कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम मुंबई-गोवा कोकण महामार्गावर झाला आहे. पावसामुळे चिपळूण-रत्नागिरी दरम्यानच्या कामथे गावाजवळ रस्त्याला भली मोठी भेग पडली आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पावसाळ्यात कोकणात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र चिपळूण-रत्नागिरी दरम्यानच्या महामार्गावर कामथे गावाजवळ रस्त्याला मोठी भेग पडली आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. खेड-चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरड कोसळण्याचा धोका आहे. दुरुस्तीसाठी हा घाट एक महिना बंद होता. त्यानंतरही त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
कोकणातील पावसाचा जोर लक्षात घेऊन खेड तालुक्यातील खोपी जांभीळवाडीतील दरडग्रस्त 7 कुटुंबियांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.