मुंबई – अर्थसंकल्पात सरकारने प्रत्येक वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये करण्यात आली, तर महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मधून पैसे काढण्याबाबत कर नियमांत बदल करण्यात आला. यात पॅनकार्ड लिंक नसल्यास पैसे काढताना टीडीएस ३० टक्क्यांऐवजी २० टक्के कापला जाणार असून हा नियम १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. ज्यांचे पॅनकार्ड अद्याप अपडेट केलेले नाही त्या पीएफ धारकांना बदललेल्या नियमाचा फायदा होईल.
ज्येष्ठ नागरिक आता बचत योजनेत ३० लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यापूर्वी या योजनेत जास्तीत जास्त १५ लाख रुपयेच गुंतवले जाऊ शकत होते. या योजनेत वार्षिक आठ टक्के व्याज दिले जाते. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आता मासिक उत्पन्न योजनेत जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील. ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजना ७.५ टक्के व्याजदरासह सुरू करण्यात आली. महिला दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करू शकतील. या गुंतवणूकीवर दोन वर्षांत ३० हजार रुपयांचा फायदा होईल.