पुणे :
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नियमित सुरु असलेल्या काही बसच्या वेळेत बदल करण्यात आला. सकाळच्या आणि संध्याकाळच्या सुमारास बस रिकाम्या धावत असल्याने मार्गांच्या वेळेमध्ये बदल केला. याची अंमलबजावणी पीएमपीच्या शहरासह ग्रामीण भागाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली.
पीएमपी प्रशासनाने उत्पन्न आणि प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील १५ डेपोअंतर्गत असलेल्या मार्गांची पाहणी करून हा निर्णय घेण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील काही मार्गांवर पहाटेच्या सुमारास प्रवासी कमी प्रमाणात असतात. तशीच स्थिती रात्री उशिराच्या वेळीदेखील होते. प्रशासनाने केलेल्या पाहणीदरम्यान असे काही मार्ग निदर्शनास आले. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागासह शहरातील पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस आणि रात्री उशिराच्या वेळेस प्रवाशांना बसची वाट पाहावी लागणार.