पुणे – राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नवीन दर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठरवले आहेत. त्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात घरगुती वापराच्या पिण्याच्या पाण्याच्या दरात प्रति हजार लिटर मागे ३० पैसे आणि औद्योगिक वापराच्या पाण्यासाठी प्रति एक हजार लिटरमागे ४.५० रुपयांची वाढ सुचवली आहे. ही दरवाढ मान्य झाल्यास पुण्यात पाणीपट्टी दुप्पटीने वाढणार आहे. सध्या पुण्याला २५ पैसे प्रति हजार लिटर पिण्याचे पाणी दिले जाते. या दरवाढीनंतर ते ५५ पैसे प्रति हजार लिटर होणार आहे.
जलसंपत्ती नियमन प्राधिकरण एमडब्ल्यूआरआरए दर ३ वर्षांनी पाणीपट्टीचे दर निश्चित करते. यापूर्वी २०१८ मध्ये पाण्याचे दर निश्चित केले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे पाण्याचे नवीन दर जाहीर झाले नव्हते. मात्र आता २०२० ते २०२३ या वर्षाचे पाणीपट्टीचे नवे दर एमडब्ल्यूआरआरएने प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार घरगुती वापराच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रति हजार लिटर ३० पैसे आणि औद्योगिक वापराच्या पाण्यासाठी ४.५० रुपयांची दरवाढ सुचवली आहे. यामुळे पुणेकरांचे पाणी दुप्पट महागणार आहे. एमडब्ल्यूआरआरएने निश्चित केलेल्या पाणी आरक्षणानुसार ५० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात प्रति व्यक्ती १५० लिटर आणि ५० लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या पालिका क्षेत्रात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणी दिले जाते. यापेक्षा पाण्याचा जास्त वापर केल्यास महापालिकांना दुप्पट दंड आकारण्याचा अधिकार देण्याचेही प्रस्तावित आहे.