पुणे- जिल्ह्य़ातील मारुंजी येथील टेकडीच्या खडकांवर
प्राचीन काळात मनोरंजनासाठी कोरले जाणारे पटखेळ आढळून आले आहेत. वेगवेगळय़ा आकारातील ४१ पटखेळांचा शोध सोज्वल साळी आणि ऋषी राणे या अभ्यासकांनी लावला आहे. पुण्याजवळ एकाच ठिकाणी असे पटखेळ आढळण्याची ही पहिलीच घटना आहे.
हा प्राचीन पटखेळांचा शोध लावणारे सोज्वल साळी म्हणाले की प्राचीन काळात भिक्षू, प्रवासी, व्यापारी डोंगरांवर, मंदिरांमध्ये मुक्काम करत. त्यामुळे मुक्कामाच्या काळात मनोरंजनासाठी खडकांवर पटखेळ कोरण्यात आले असावेत. त्या काळी त्या देशात प्रचलित असलेले खेळ खडकांवर कोरल्याचे दिसून येते. पौराणिक आणि बौद्ध ग्रथांमध्येही या पटखेळांचा उल्लेख आढळतो. या खेळांतील वाघ-बकरीसारखे खेळ आजही खेळले जातात. खडकांवर कोरलेल्या या खेळांविषयी अॅड. मारुती गोळे यांच्याकडून माहिती मिळाली. त्यानंतर प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता एकूण ४१ खेळ आढळून आले.मात्र या ठिकाणाचा आणि या खेळांचा आता अधिक अभ्यास करण्याची, या ठिकाणाचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे