हातकणंगले – पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील शिरोली जवळच्या निमंत्रण हॉटेलसमोर भीषण अपघात झाल्याची घटना काल सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात पितापुत्रांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हाॅटेल आमंत्रण समोर अज्ञात वाहनाने मोपेडला धडक दिल्याने हा भीषण
अपघात झाला. या धडकेत मौजे वडगांव येथील विश्वास आण्णापा कांबळे (५४ ) आणि त्यांचा मुलगा पंकज विश्वास कांबळे ( २४) हे दोघे पितापुत्र जागीच ठार झाले. कांबळे हे आपल्या दुचाकीने वाठार येथे नातेवाईकांकडे कामानिमित्त जात होते. दरम्यान त्यांच्या मोपेडला अज्ञात अवजड वाहनाने धडक दिली.यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता कोल्हापूर येथील सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.विश्वास कांबळे हे ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते.मोठ्या मुलाचे यापूर्वी निधन झाले आहे.त्यामुळे ते लहान मुलगा पंकज यास सोबत घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.पंकज हासुद्धा शेतमजूर म्हणून काम करत होता.त्यांच्या अशा अपघाती मृत्यूने मौजे वडगांव गावात हळहळ व्यक्त होत आहे.