पुणे – हवामान विभागाने पुणे, मुंबई, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच याठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना हवामान विभागाने खबरदारीचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात दरड कोसळल्याने पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोंगरमाथ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने यापूर्वीच केले होते. त्यातच आता अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, डोंगराळ भागात जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पावसामुळे ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा १ जून ते ७ जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.