पुणे – सुप्रसिद्ध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता केवळ १४ प्राध्यापक राहिले आहेत. सहयोगी ३५ आणि सहायक पदावर १२० प्राध्यापक कार्यरत आहेत. अनुदानित पदांपैकी तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असून अनेक विभाग प्राध्यापकांविना बंद पडण्याची वेळ आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद असल्याचा दूरगामी परिणाम विद्यापीठाच्या दर्जावर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यावरणशास्त्र, मानव्य आणि सामाजिक विज्ञान (आयडीएस), उपकरणशास्त्र या विभागांमध्ये पूर्णवेळ एकही प्राध्यापक नाहीत. वातावरण व अवकाशशास्त्र विभाग, ललित कला केंद्र, संरक्षणशास्र, शिक्षणशास्र, अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, क्रीडा, स्री अभ्यास या विभागांमध्ये केवळ एक प्राध्यापक आहेत, अॅंथ्रोपोलॉजी, सज्ञापनशास्र, इंग्रजी, इतिहास, संस्कृत, समाजशास्त्र या विभागांमध्ये दोन प्राध्यापक आहेत. यामुळे प्राध्यापकांवर एकापेक्षा अधिक विषय शिकविण्याची वेळ आली आहे. अनेक प्रयोगशाळांतील दिग्गज प्राध्यापक निवृत्त झाल्याने संशोधन बंद झाले आहे. प्राध्यापकांअभावी काही विभाग बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच दोन विभागांना एकच विभागप्रमुख अशीही परिस्थिती आहे.
याबाबत प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, ‘आपल्याकडे मंजूर ३८४ पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर लक्षात घेता तातडीने प्राध्यापक भरतीला प्राधान्य आहे. शासन स्तरावर प्राध्यापक भरतीला परवानगी मिळावी म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहोत.’ दरम्यान, प्राध्यापकांच्या रिक्त पदांचे भीषण परिणाम पुढील पाच वर्षांत जाणवतील. शिक्षणाचा दर्जा तर खालावेल, मात्र संशोधनालाही मोठा फटका बसणार आहे. प्राध्यापकांची भरती सातत्याने होत राहिल्यास विभागांचा दर्जा आणि संशोधनात्मक वाढ कायम राहते, असे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी म्हटले.