पुणे – पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमान सेवेला मान्यता मिळाली आहे. यामुळे प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. २ डिसेंबर २०२२ पासून ही विमान सेवा सुरू होणार आहे. आठवड्यातून ४ दिवस ही सेवा असणार आहे. याचा फायदा व्यावसायिक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.
पुणे-सिंगापूर विमानसेवेची मागणी अनेक वर्षांपासून विमान प्रवासी करत होते. त्याबाबतचा प्रस्ताव गेल्या महिन्यात विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या विमान सेवेला मान्यता दिली. बँकॉक आणि दोहा येथेही विमान सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-सिंगापूर ही विमानसेवा आठवड्यातून ४ दिवस चालवण्यात येणार आहे. दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी या सेवेचा लाभ पुणेकरांना घेता येईल. यामुळे पुण्यातून सिंगापूरला ८ तासांत जाणे शक्य होणार आहे. सिंगापूर ते पुणे प्रवास ४ तासांत यामुळे शक्य होईल. या विमानाच्या दिवसातून २ फेऱ्या होतील. पुणे-सिंगापूर विमान दुपारी २.१० आणि रात्री १०.३० वाजता आहे. सिंगापूर येथून हे विमान सकाळी ११.५० आणि दुपारी ३.१५ वाजता आहे. या विमानाच्या इकॉनॉमिक क्लाससाठी १७ हजार ७९९ रुपये, प्रीमियम इकॉनॉमीसाठी ३२ हजार ४५९ आणि बिझनेस क्लाससाठी ८२ हजार ९९९ रुपये तिकीट आहे.