संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

पुण्याच्या भूमिगत मेट्रोची चाचणी यशस्वी; रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर स्थानकापर्यंतचे काम पूर्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – रेंजहिल डेपो ते रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक आणि रेंजहिल उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानक या तीन किलोमीटर अंतराच्या टप्प्यात मेट्रोची चाचणी काल घेण्यात आली.या चाचणीनंतर येत्या काही दिवसांत भूमिगत मेट्रो मार्गिकेअंतर्गत प्रवासी सेवाही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका भवन स्थानक ते स्वारगेट या ११.४ किलोमीटरच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा सहा किलोमीटर लांबीचा मार्ग भूमिगत आहे. या भूमिगत मार्गाच्या बोगद्याचे काम ४ जून २०२२ मध्ये टनेल बोअरिंग मशीनच्या (टीबीएम) साहाय्याने पूर्ण करण्यात आले. त्यानंतर बोगद्यामध्ये ट्रॅक, ओव्हर हेड विद्युत तारा आणि सिग्नलची कामे वेगाने करण्यात आली होती.
भूमिगत मार्गाचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. बोगदा करताना बाहेर पडणारा राडारोडा साधारपणे ७० ते ८० फुटांवरून वर आणून त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम महामेट्रोला करावे लागले. तर भूमिगत स्थानकांसाठी ‘कट ॲण्ड कव्हर’ तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी करण्यात आला. शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालय, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट या गजबजलेल्या ठिकाणी साहित्याची ने-आण करणे जिकिरीचे ठरले होेते. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करत रेंजहिल ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानक भूमिगत मेट्रो मार्गाचे काम करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
चाचणीला तीस मिनिटांचा कालावधी लागल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. ‘भूमिगत मेट्रो चाचणी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा, आव्हानात्मक असा टप्पा होता. मेट्रोचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून एक एक टप्पा पूर्णत्वाकडे जात आहे. येत्या काही दिवसांत फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर स्थानक या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होईल,’ असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami