संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्‍लांविरोधात गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणार्‍या फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांनी चौकशीचा फास अधिक घट्ट केला असून पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रश्मी शुक्ला या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. परमबीर सिंग यांच्यावरील कारवाईनंतर राज्यातील दुसर्‍या मोठ्या आयपीएस अधिकार्‍याविरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेली ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठवलेला गोपनीय अहवाल मार्च 2021 मध्ये समाजमाध्यमांवर व्हायरला झाला होता. रश्मी शुक्ला यांच्या या अहवालातील तपशील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले होते. तसेच त्याआधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलिसांच्या नियुक्त्या व बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला होता. यानंतर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे आ. जितेेंद्र आव्हाड यांनी गोपनीय अहवाल रश्मी शुक्ला यांनीच फोडत देवेंद्र फडणवीस यांना पुरवल्याचा आरोप केला. या घटनाक्रमानंतर फोन टॅपिंगप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अनोळखी व्यक्तीविरोधात शासकीय गुपिते अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर 2021 च्या पावसाळी अधिवेशनात 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात संपूर्ण फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. आता या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami