पुणे – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या वैद्यकीय कंपनीने महिलांच्या गर्भाशय कॅन्सरपासून संरक्षणासाठी भारतातील पहिली स्वदेशी क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लसीची निर्मिती केली आहे. ही लस बाजारात आणण्यासाठी कंपनीने 8 जून रोजी डीजीसीआयकडे परवानगी अर्ज दाखल केला आहे. या लसीच्या फेज 2 आणि फेज 3 च्या क्लिनिकल चाचण्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या लसीला मान्यता मिळाल्यास गर्भाशय कॅन्सरने पीडित महिलांना दिलासा मिळणार आहे. तसेच भारतासाठी देखील ही मोठी गोष्ट असणार आहे. कारण भारताला आत्तापर्यंत गर्भाशय कॅन्सरच्या लसीसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते. सरकार या लसीचा लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. याअंतर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलींना कर्करोगापासून वाचवण्यासाठी ही लस दिली जाऊ शकते. सध्या गर्भाशय कॅन्सरवरील लस फक्त खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे. मात्र ती खूप महाग असून एक डोसची किंमत 4 हजार रुपयांपर्यंत आहे. दरम्यान या कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागरुकताही फारच कमी आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा महिलांमध्ये होणारा मोठा आजार आहे.