पुणे – मागील दोन दिवसांपासुन पुणे शहरातून अचानक थंडी गायब झाली असून आगामी आठवडाभर किमान तापमानात वाढ होणार असल्याने कडाक्याची थंडी जाणवणार नाही. दरम्यान,काल रविवारी शहराच्या किमान तापमानात तब्बल ५.४ अंशांनी वाढ झाली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तिकडून बाष्पयुक्त वारे शहरात येत आहेत. त्यामुळे आठवडाभर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.शहरावरील हवेचा दाबही कमी झाल्याने बाष्पयुक्त वारे वेगाने इकडे येत आहेत.त्यामुळे शहरावर ढगांची गर्दी आहे.सूर्य दर्शन लवकर होत नाही. उगवतीलाच सूर्य ढगाआड झाकला जात आहे, इतके दाट ढग शहरावर आहेत. शहराचे किमान तापमान १ डिसेंबर रोजी ११ अंशावर होते, मात्र दोनच दिवसांत ते १८.४ अंशांवर गेले.शनिवारी ३ डिसेंबर रोजी शहराचे किमान तापमान १४.५ अंशांवर होते.रविवारी ते १८.४ अंशांवर गेले.असाच प्रकार शहरातील सर्व भागात असेच वातावरण आहे. पाषाण,लोहगाव,चिंचवड,लवळे,मगरपट्टा या भागातील किमान तापमान आगामी आठवडाभर १० डिसेंबरपर्यंत १६ ते २१ अंशांवर राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे आगामी आठवड्यातही शहरात कडाक्याची थंडी जाणवणार नाही.