पुणे- भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून गो संशोधन आणि विकास प्रकल्प आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये प्रथमच गिर जातीच्या कालवडीचा जन्म झाला. या तंत्रज्ञानातून सुमारे 150 पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार असल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली. राहुरी येथील एनडीडीबी मार्फत राबविण्यात येणार असून उच्च वंशावळीचा देशी गोवंश व त्यांची संख्या वाढवण्यासाठी, संवर्धनासाठी खूप मोठी मदत होणार आहे.
देशातील शुद्ध देशी गोवंशाची असलेली घटती संख्या पाहता जलदगतीने उच्च उत्पादन क्षमता असणार्या गाईंची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे मत कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केले आणि सर्व शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले. संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर हे काम करत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी ही भूषणावह बाब असून देशामध्ये देशी गाईंची घटती संख्या पाहता भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हा आशेचा किरण असून या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्यांपर्यंत होणे अत्यंत गरजेचे आहे. देशामध्ये एकूण गाईच्या संख्येपैकी 75 टक्के गाई ह्या गावठी स्वरूपात आढळत असून फक्त 25 % गाई शुद्ध स्वरूपात आहेत. त्यामुळे भविष्यात उच्च दर्जाच्या जलदगीतेने गाई तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज असेल, असे डॉ. प्रशांतकुमार पाटलांनी सांगितले.