संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

पुन्हा एसी लोकल सुरू करण्याची चाल बदलापुर स्थानकात लावला फलक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

 प्रवासी संघटनांसोबत आज प्रशासनाची बैठक

बदलापूर – २० दिवसांपूर्वी प्रवाशांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते बदलापूर सुरू केलेली एसी लोकल बंद केली होती. मात्र आता पुन्हा एकदा ही एसी लोकल सुरू करण्याची चाल रेल्वे प्रशासन खेळू लागले आहे. कारण ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकल सुरू करण्यासंदर्भात प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने सूचना मागवल्या आहेत. तसेच त्यासंदर्भात प्रवाशांकडून सूचना मागवणारा फलक बदलापूर रेल्वे स्थानकात लावला आहे.दरम्यान रेल्वे प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी बुधवार १४ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनातर्फे बदलापूर येथे प्रवासी संघटना,पोलीस प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
एसी लोकल सुरू करण्याबाबत प्रवाशांना कोणतीही हरकत किंवा सूचना असल्यास त्यांनी स्थानक व्यस्थापक कार्यालयाशी २० सप्टेंबर पर्यंत संपर्क साधावा असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.प्रवाशांचा केवळ एसी लोकल सुरू करण्यास विरोध नाही.मात्र रेल्वे प्रशासनाने साध्या लोकल रद्द करून पून्हा त्याऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्याच्या निर्णयाला विरोध आहे,असे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.त्यामुळे बदलापुरात वातानुकूलित लोकलवरून पुन्हा वादंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान,ऑगस्ट महिन्याच्या अखरेसी मध्य रेल्वे प्रशासनाकडून संध्याकाळच्या वेळेतील मुंबईहून बदलापूरसाठी सुटणाऱ्या सध्या लोकलच्या ऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्यात आली होती. लोकल अचानक रद्द केल्याने प्रवाशांना त्याऐवजी खोपोली लोकलने प्रवास करावा लागला होता. त्यामुळे प्रवाशांना मोठया गर्दीचा सामना करावा लागला होता.यामुळे संतप्त प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सतत तीन दिवस रेल्वे प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत आंदोलन केले होते.प्रवाशांचा तीव्र विरोध पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने पुन्हा वातानुकूलित लोकल रद्द करून त्याऐवजी साधी लोकल चालविण्याचा निर्णय घेतला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami