फलटण – जिल्ह्यातील फलटण-गिरवी रस्त्यावरील पुलाचे काम सुरू करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता मोहन खोसे यांनी केले आहे.
हा प्रमुख रस्ता बंद ठेवण्यात आल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतुक गिरवी नाका-रिंग- अहिल्यादेवी चौक – डॉ.राऊत
हॉस्पिटल- पाटबंधारे खात्याचे विश्रामगृह-दहीवडी आणि ग्रामीण रुग्णालय मार्गे वळविण्यात आली आहे. जाधववाडी गावच्या हद्दीत ओढ्यावर हा पूल आणि पोहोच रस्त्याचे काम केले जाणार आहे. मात्र तात्पुरती वाहतुक बंद केल्याने आणि वाहनांना लांबचा पल्ला गाठावा लागत असल्याने वाहनधारक नाराजी व्यक्त करत आहेत.गेल्यावर्षी मार्च महिन्यात इगल कन्स्ट्रक्शन कंपनीला या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आता प्रत्यक्ष हे काम सुरू झाले आहे.या नवीन पुलाची रुंदी ११.२५ मीटर इतकी असून प्रत्येकी ९ मीटर गाळ्यांचा हा पूल आहे.तसेच पुलाबरोबर २०० मीटर लांबीचे जोडरस्ते,माती भराव मजबुतीकरण, खडीकरण आणि डांबरीकरण आदी कामे केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता मोहन खोसे यांनी दिली.