कोल्हापूर – मराठी प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप उमटवणाऱ्या नागराज मंजुळेंनी एक मोठी घोषणा केली. प्रसिद्ध पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागराज यांनी कोल्हापूरातील कुस्तीच्या आखाड्यातून ही घोषणा केली. त्यामुळे हा नवा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांमध्ये खास आकर्षण ठरणार आहे.
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर प्रभावी मांडणी करत प्रेक्षकांना सजग करणारे चित्रपट तयार करण्यात नागराज यांचा हातखंड आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेली घोषणा आता सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांचे व्यक्तिमत्व चित्रपटाच्या निमित्ताने लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
चित्रपटाची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव झाला. चाहत्यांनी या नव्या चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात नागराज यांचा घर,बंदुक, बिरयाणी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या ट्रेलरला तसेच गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.