पंढरपूर :हॉटेलचालक अशोक शिनगारे यांनी भर रस्त्यावर सदाभाऊ खोत यांना अडवून उधारीचे पैसे परत मागितल्याचा व्हिडियो व्हायरल झाल्यांनंतर या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आता पैसे बुडवायचे म्हणून राष्ट्रवादीचे नाव सदाभाऊ घेत आहेत, पण मी राष्ट्रवादीचा नव्हे तर रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या हॉटेलाची उधारी मिळेपर्यंत सदाभाऊ यांना अडवणार आणि पैसे वसूल करणार अशी स्पष्ट भूमिका उधारीसाठी सदाभाऊंचा ताफा अडवणारे हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान, माझा आणि राष्ट्रवादीचा कसलाही संबंध नसून माझ्यावर असलेल्या गुन्हेगारी केसबाबत सदाभाऊ खोटी माहिती देत आहेत. मी कधीही वाळूचा व्यवसाय केलेला नसून कर्नाटक येथून माझ्याकडे आलेले १३ किलो सोने मी सांगोला पोलिसांच्यामार्फत कर्नाटक पोलिसांना मिळवून दिले होते. माझ्यावर कोणत्याही केस नसून ज्या केस असतील त्याला मी तोंड देण्यास खंबीर आहे. मात्र सदाभाऊंनी माझ्या हॉटेलची आठ वर्षांपूर्वीची उधारी आधी द्यावी अशी मागणी केली.सदाभाऊ खोटी माहिती देऊन पैसे बुडवायचा तयारीत असले तरी मी माझे पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नाही, ते येतील तेव्हा त्यांच्या गाड्या अडवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, आज सदाभाऊ यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन अशोक शिनगारे याच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावल्याने आता सदाभाऊ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.आता सदाभाऊ आपण कोणाचीही उधारी बुडवली नसल्याचे सांगत असले तरी माढा लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ यांचे काम करणारे सांगोल्यातील परमेश्वर कोळेकर यांनी मात्र सदाभाऊ यांनी अनेकांचे पैसे बुडविल्याचा आरोप केला आहे. अजूनही सदाभाऊ यांच्या उधारीसाठी फोन येत असल्याचे परमेश्वर कोळेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.त्यामुळे आता सदाभाऊ ही ६६हजार ४५० रुपयांची उधारी देणार की पुन्हा शिनगारे त्यांची वाट अडवणार हे पाहावे लागणार. या सर्व प्रकारामुळे सदाभाऊ यांची राज्यभरात नाचक्की झाली आहे, हे देखील तितकेच खरे.