नवी दिल्ली – प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोन्नियिन सेल्वन पार्ट वन येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय ही पझुवरची राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेत ती कमालीची सुंदर दिसत असून तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड भावला आहे. मात्र या लूकसाठी कारागीरांना मोठी मेहनत घ्यावी लागल्याचे कळते आहे. ऐश्वर्याची वेशभूषा तयार करण्यासाठी १८ कारागीर ६ महिने मेहनत घेत होते, असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याची ही वेशभूषा तयार करण्यासाठी तीन डिझायनरची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ कारागीर ६ महिने काम करत होते. हैदराबादच्या किशनदास कंपनीच्या माध्यमातून ही डिझाईन तयार करण्यात आली आहे. नंदिनीच्या लूकमध्ये वापरण्यात आलेली आभूषणे, वस्त्रे प्रचंड महागडी असून सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा हा नंदिनी लूक व्हायरल झाला आहे.