नवी दिल्ली – प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोनाल्डोच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोनाल्डो दाम्पत्य शोकाकुल झाले आहे. रोनाल्डोने स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली. यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. रोनाल्डोची प्रेयसी असलेल्या जॉर्जियाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यातील एका बाळाचा मृत्यू झाला, तर एक मुलगी सुरक्षित आहे. दरम्यान, आता ही मुलगीच आमच्या जगण्याची आशा असल्याचे रोनाल्डोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. आमच्या वेदना फक्त आई-बाबा झाले आहेत त्यांनाच कळू शकतात, असेही रोनाल्डोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. नवजात बाळाच्या मृत्यूमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत, असेही रोनाल्डोने म्हटले आहे. रोनाल्डो आणि जॉर्जिया यांच्यावर कोसळलेल्या दुःखामुळे रोनाल्डोच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत जे झाले, त्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिया यांच्या नावासह एक पत्र शेअर केले आहे. हे पत्र ट्वीट करत रोनाल्डोने म्हटले आहे, की, ‘आम्ही आमच्या नवजात बाळाला गमावले. आम्हाला होत असलेल्या वेदना फक्त आई-वडीलच समजू शकतात. जॉर्जियाला जुळी मुलं झाली. त्यातील मुलाला आम्ही गमावले असून मुलगी सुखरुप आहे. आता ही मुलेच आमच्यासाठी आधार, आनंद आणि आशा आहेत. डॉक्टर आणि नर्सेसनी खूप प्रयत्न केले, काळजी घेतली आणि आम्हाला धीरही दिला पण नवजात बाळ दगावल्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत.’
ऑक्टोबर महिन्यात रोनाल्डो आणि जॉर्जिया यांनी गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. रोनाल्डोला दुसऱ्यांना जुळी होणार होती. त्यामुळे हे दाम्पत्य आनंदात होते. खास प्लान्सही या दोघांनी बाळांच्या आगमनासाठी केले होते. मात्र अनपेक्षितपणे त्यांचे एक बाळ प्रसुतीवेळी दगावल. डॉक्टरांनीही बाळाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही.
दरम्यान, २०१० साली रोनाल्डो पहिल्यांदा पिता झाला होता. त्याच्या मुलाचे नाव ख्रिस्तियानो ज्युनिअर असे आहे. त्यानंतर रोनाल्डोच्या आयुष्यात जुळ्या मुलांनी आनंद द्विगुणित केलेला. इव्हा आणि माटेओ असे रोनाल्डोच्या जुळ्या मुलांची नावे आहेत. दरम्यान, यानंतर रोनाल्डो आणि प्रेयसी जॉर्जिया यांनी आपल्याला पहिलं बाळ होण्याची बातमी दिली होती. २०१८ मध्ये रोनाल्डो आणि जॉर्जिया यांच्या आयुष्यात अलानाची इन्ट्री झाली होती. त्यानंतर पुन्हा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रोनाल्डो आणि जॉर्जिया यांना जुळी होणार असल्याची बातमी समोर आली होती.