संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

पोलिसांची परवानगी नसतानाही सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

छत्रपती संभाजीनगर : सकल हिंदू समाजाकडून नामांतरणाच्या समर्थनात आज ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ काढण्यात आला होता. पोलिसांकडून या मोर्च्याला परवानगी नाकारली होती. पण तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला होता. गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली. या मोर्च्याला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहिले होते. मोर्च्यात उपस्थित असलेल्या अनेकांच्या हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, श्री रामाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे पोस्टर होते. आजच्या मोर्च्याला क्रांती चौक येथून आरंभ झाला आणि शांततेच्या मार्गाने सभा घेत औरंगपुरा इथे समारोप करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला केंद्राने परवानगी दिल्यानंतर राज्यात एकच जल्लोष करण्यात आला. पण औरंगाबादच्या नामांतरणाला एआईएमआईएम महाराष्ट्र प्रमुख इम्तियाज जलील यांनी विरोध करत साखळी उपोषण केले होते. यामुळे काही दिवस जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण नामांतरणाच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक नेते देखील सहभागी होते. क्रांती चौक येथून या मोर्च्याला सुरुवात झाली होती. जिल्हा कोर्ट, विवेकानंद कॉलेज, निराला बाजार येथून हा मोर्चा मार्गस्थ होत औरंगपुरा येथे या मोर्च्याची सांगता करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील नामांतराला पाठिंबा देण्यासाठी असाच एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी काही वेळातच या मोर्च्याला अडवले होते.

राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे हे सुद्धा या मोर्च्यामध्ये उपस्थित राहिले आहेत. यावेळी ते बोलताना म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे आणि मगच जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हान मंत्री अतुल सावे यांनी केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या