उरण- जमिन संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना दिलेले नोकरीचे आश्वासन बीपीसीएलने पाळले नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात ९ नोव्हेंबरला प्रकल्पग्रस्त ‘गेट बंद’ आंदोलन करणार आहेत. त्यात सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
उरण तालुक्याच्या भेंडखळ येथे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या वारसांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. परंतु त्यांनी पूर्ण केलेले नाही. येथील ३०० पैकी केवळ १७० प्रकल्पग्रस्तांनाच नोकऱ्या दिल्या. त्यातील ८० पेक्षा अधिक सेवानिवृत्त झाले आहेत. भेंडखळमधील १५० प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित आहेत. ३० वर्षांपासून ते त्यासाठी संघर्ष करत आहेत. प्रकल्पग्रस्त तरुणाने १७ ऑक्टोंबरपासून कंपनीसमोर उपोषण सुरू केले आहे. १४ दिवसानंतरही व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नाही. म्हणून गावातील इतर तरुणांनी साखळी उपोषण सुरू केले. त्याचीही कंपनी दखल घेत नाही. त्यामुळे ९ नोव्हेंबरला ‘गेट बंद’ आंदोलनचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकल्पासाठी भेंडखळ, बोकडवीरा, डोंगरी, फुंडे आदी गावांतील सुमारे ३०० शेतकऱ्यांची २०७ हेक्टर जमीन संपादित केली आहे.