मुंबई – भारतीय संगीतकार आणि प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मागील सहा महिन्यांपासून किडनीसंबंधित विकारांशी ते झुंज देत होते. तसेच त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये काही प्रमाणात ओळखल्या जाणाऱ्या संतूर वाद्याला शिवकुमार शर्मा यांनी शास्त्रीय दर्जा दिला आणि सितार, सरोद यांसारख्या प्रसिद्ध वाद्यांच्या रांगेत त्याला नेऊन ठेवले. त्यामुळे संतूर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करून देण्यात शिवकुमार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचा जन्म जम्मूमध्ये झाला होता. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी संतूर शिकण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम १९५५ साली मुंबईत झाला होता. चित्रपटसृष्टीत त्यांनी १९८० साली ‘सिलसिला’ या चित्रपटापासून सुरुवात केली. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत अनेकवेळा संगीत दिल्यामुळे त्यांची जोडी खूप गाजली. त्यांना ‘शीव-हरी’ नावाने ओळखले जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले.
शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांना १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना १९८५ मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचे मानद नागरिकत्त्वही प्रदान करण्यात आले होते.