नवी दिल्ली : गेल्या महिन्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे येत्या प्रजासत्ताक दिन सोहळय़ासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी हे प्रमुख पाहुणे असू शकतात,अशी माहिती समोर आली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेला हा प्रस्ताव मान्य केल्यास इजिप्तचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असेल. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष भारतात आल्यास अरब देशांमधील संबंध आणखी चांगले होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. 2023 मध्ये जी-20 शिखर परिषद भारतात होत असून नऊ देशांच्या यादीत इजिप्तच्या नावाचाही समावेश भारताने केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे 2021 आणि 2022 या वर्षात कोणतेही प्रमुख पाहुणे या सोहळ्यानिमित्त आमंत्रित केले नव्हते.