नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिन सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. कारण नुकतेच दिल्लीच्या गाझीपूर फूलमंडीमध्ये सापडलेली स्फोटके कशी आणि कुठून आली याबाबत पोलिसांची झोप उडाली आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणार्या माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनाही धमकी देणारा फोन आला आहे. आता ताज्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांना प्रजासत्ताक दिनी दहशतवादी कटाचा इशारा मिळाला आहे, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार्या पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांना धोका असल्याचे नऊ पानांचे इंटेलिजन्स, प्रत मिळाली आहे. तर कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या पाच मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान तसेच पाकिस्तान क्षेत्राबाहेरील गटांकडून धमकी आल्याचा उल्लेख या चिठ्ठीत आहे.
या गटांचा उद्देश उच्चपदस्थ प्रतिष्ठित व्यक्तींना लक्ष्य करणे आणि सार्वजनिक मेळावे, महत्त्वाच्या आस्थापने आणि गर्दीच्या ठिकाणी तोडफोड करणे हे होते.
दरम्यान, ड्रोननेही हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. लष्कर-ए-तैयबा, द रेझिस्टन्स फोर्स, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिज्बुल-मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी गट या दहशतवादी धोक्यामागे असल्याचे इनपुटमध्ये म्हटले आहे. तसेच इनपुटमध्ये असे म्हटले आहे की पाकिस्तानमधील खलिस्तानी गट पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा एक गट एकत्र करत आहेत. जेणेकरून ते पंजाब आणि इतर राज्यांमध्ये हल्ल्यांची योजना आखू शकतील. दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये मिळालेल्या एका इनपुटनुसार, खलिस्तानी दहशतवादी गट पंतप्रधानांच्या सभेवर आणि पर्यटन स्थळांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचीही माहिती समोर आली होती.