सातारा : सध्या महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडल्याप्रकरणी काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यातच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सरसेनापाती प्रतापराव गुजर यांच्या जीवन चरित्रावर काढलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरही हाच आरोप करण्यात आला आहे.यावरुन प्रतापराव गुजर यांच्या जन्मगावी ग्रामस्थ आक्रमक झाले असून मांजरेकरांच्या निषेधार्थ रविवारी मोर्चा काढण्यात आला.
मांजरेकर यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडल्याने सातारा जिल्ह्यातील भोसरे या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मगावी चित्रपटाबाबत ग्रामसभेत तीव्र आक्षेप घेण्यात आला. ग्रामस्थांनी ग्रामसभेत चित्रपटातील विविध आक्षेपार्ह मुद्दे उपस्थित केले.यामध्ये भोसरे हे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव असून महेश मांजरेकरांना या गावाचा विसर पडला. त्यांनी चित्रपटात सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव कोकणातले दाखवले आहे. भोसरे गावाला प्रतापराव गुजर यांच्यामुळेच पर्यटन स्थळाचा विशेष ब दर्जा प्राप्त झाला आहे. यासंदर्भातील गावात ऐतिहासिक दस्तावेज आज देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे इतिहासाची मोडतोड करून चित्रपट तयार करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गावातून फेरी काढत महेश मांजरेकर यांच्या निषेधार्थ घोषणा देत संताप व्यक्त केला.